'त्या' मुलाचे आधारकार्ड प्रशासनाने केले अपडेट

मौजा शंकरपूर (ता. चिमूर) येथे आयोजित आधारकार्ड शिबिरामध्ये वनमाला जीवन सावसाकडे ह्या मुलाचे आधारकार्ड काढण्यामरीता आल्या होत्या. वनमाला यांच्याजवळ असलेला मुलगा फोटो काढतांना हालल्या मुळे मागे असलेल्या बॅनरवरील तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा फोटो प्रणालीमध्ये चुकीने अपलोड झाल्याचे चिमुर तालुका प्रशासनाने स्पष्ट केले.  तथापी मुलगा जीगल सावसाकडे याचे आधारकार्ड तालुका प्रशासनाने अपडेट केले असून तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या फोटोऐवजी आता मुलाचा फोटो अपलोड करण्यात आला आहे.


चुकीचा फोटो अपलोड झाल्याने कळताच शंकरपूर येथील तलाठ्याला वनमाला सावसाकडे यांच्या घरी पाठविण्यात आले. मुलाला व त्याच्या आईल संबंधित तलाठ्याने आधार सेंटर वर घेऊन जात जीगलचे आधारकार्ड तात्काळ अपडेट करून दिले व संबंधितांना त्यांच्या घरीसुध्दा पोहचविले. यात प्रशासनाकडून कोणतीही दरंगाई झाली नसल्याचे तसेच आधार अपडेटच्या पावतीवर जीगलचे सावसाकडे याचाच फोटो असल्याचे तालुका प्रशासनाने म्हटले आहे. 

तसेच आधारकार्ड काढतांना किंवा अपडेट करतांना काही चूक झाली असल्यास तत्काळ आधार सेंटरवर कळविण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.