अखेर चंद्रपूरचा महापौर ठरला"



चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तासंघर्षावर आता पडदा पडताना दिसत आहे. काँग्रेसकडून स्पष्ट संकेत देण्यात आले असून, शहरात सत्ता आपल्याकडेच राहणार असल्याचा ठाम विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. महापौर पदावरून सुरू असलेली अनिश्चितता आता संपुष्टात आली असून, काँग्रेसचाच झेंडा चंद्रपूरमध्ये फडकणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

वडेट्टीवार म्हणाले की, आज गटनेत्याची निवड होणार असून महापौर पदासाठीचा उमेदवारही निश्चित करण्यात आला आहे. सायंकाळपर्यंत याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या राजकारणात स्थैर्य येणार असल्याचे चित्र आहे.

सत्तास्थापनेसाठी काँग्रेसने शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांना सोबत घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहितीही त्यांनी दिली. शिवसेनेसोबत सकारात्मक चर्चा झाली असून, परस्पर विश्वासातून ही भागीदारी आकाराला येत आहे. सत्तेत शिवसेनेला योग्य तो वाटा दिला जाईल, असे आश्वासनही वडेट्टीवार यांनी दिले.

याचबरोबर, आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हालचालींना वेग दिला आहे. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस विविध मित्रपक्षांसोबत आघाडी करण्याच्या तयारीत आहे. वंचित बहुजन आघाडी, शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह संभाव्य युतीबाबत चर्चा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही स्थानिक संघटना आणि पक्षांनाही सोबत घेण्याचा विचार सुरू असल्याचे संकेत त्यांनी दिले.

महानगरपालिकेतील सत्तासमीकरण स्पष्ट झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष महापौर आणि गटनेत्याच्या नावाकडे लागले आहे. आज सायंकाळी होणारी घोषणा चंद्रपूरच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ठरणार आहे.