स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का

रजत ढोंगे व सचिन मडावी यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश

पोंभुर्णा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोंभुर्णा तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, शिंदेसेना युवासेना तालुका प्रमुख रजत ढोंगे आणि शिंदेसेना शिवसेना तालुका संघटक सचिन मडावी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार संजय देरकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.

युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे व युवासेना उपजिल्हाप्रमुख महेश श्रीगिरीवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या पक्षप्रवेशामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संघटनात्मक ताकदीत भर पडली आहे. आगामी नगरपंचायत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता या पक्षप्रवेशाला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर तसेच शिवसेनेच्या मूळ विचारधारेवर विश्वास व्यक्त करून रजत ढोंगे, सचिन मडावी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. आगामी काळात सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवून पक्षाची संघटना तळागाळापर्यंत मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी बोलताना युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे म्हणाले, “उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर आणि शिवसेनेच्या मूळ विचारधारेवर विश्वास ठेवून रजत ढोंगे, सचिन मडावी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे संघटनेला निश्चितच बळ मिळणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवासेनेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करून जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमकपणे संघर्ष करू. पोंभुर्णा परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची ताकद वाढवून आगामी निवडणुकीत ताकदीने मैदानात उतरू.”

या पक्षप्रवेशावेळी युवासेना विस्तारक संदीप रियाल पटेल, शिवसेना महानगर प्रमुख सुरेश पचारे, शिक्षक सेना जिल्हाप्रमुख राजेश नायडू, युवासेना चंद्रपूर शहरप्रमुख फर्दीन सय्यद, युवासेना बल्लारशा समन्वयक सोहेल नवशद खान, युवासेना चंद्रपूर उपतालुका प्रमुख विवान रामटेके, युवासेना पोंभुर्णा शहरप्रमुख नोकेश कपाट, उपशहरप्रमुख सुरज कावळे यांच्यासह शिवसेना, युवासेना तसेच विविध आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शिंदेसेनेतील पदाधिकाऱ्यांसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केल्यामुळे पोंभुर्णा परिसरातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक वेग मिळणार असल्याचे चित्र आहे.