चंद्रपूर | आकाश नामेवार
चंद्रपूर महापालिकेतील सत्तास्थापनेचा तिढा अखेर सुटताना दिसत आहे. काँग्रेसने शहरात सत्ता स्थापन करण्यासाठी हालचालींना वेग दिला असून, आज गटनेता आणि महापौर पदाच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, चंद्रपूरमध्ये काँग्रेसचं नेतृत्व असलेली सत्ता स्थापन केली जाणार असून, शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेतले जाणार आहे. शिवसेनेसोबत सकारात्मक चर्चा झाली असून, त्यांनी काँग्रेस नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे सत्तेतील भागीदारी शिवसेनेला दिली जाईल, असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद आता संपुष्टात आल्याचं चित्र आहे. महापौर पद ओबीसी महिला वर्गासाठी आरक्षित झाल्यानंतर पक्षात मोठी चुरस निर्माण झाली होती. माजी महापौर संगीता अमृतकर, सुनंदा धोबे, वनश्री मेश्राम आणि संजीवनी वासेकर ही चार नावे प्रमुख दावेदार म्हणून चर्चेत होती.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेतृत्व आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांना मान्य होईल असा समतोल उमेदवार निवडण्यावर एकमत झाल्यानंतर संजीवनी वासेकर यांच्या नावावर अंतिम निर्णय झाल्याची चर्चा आहे.
संजीवनी वासेकर यांनी प्रभाग क्रमांक 10 मधून विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे आरक्षण जाहीर होण्याआधी त्यांच्या नावाची कुठेही चर्चा नव्हती. मात्र अचानक त्या महापौर पदाच्या शर्यतीत आल्या आणि आता त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं बोललं जात आहे.
आज सायंकाळपर्यंत गटनेता आणि महापौर पदाच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा होणार असल्याने चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष याकडे लागलं आहे.


