पक्षहितासाठी पाऊल मागे; चंद्रपूर काँग्रेसमधील वादावर तोडगा विजय वडेट्टीवार यांची माहिती

पक्षहितासाठी पाऊल मागे; चंद्रपूर काँग्रेसमधील वादावर तोडगा विजय वडेट्टीवार यांची माहिती


चंद्रपूर | आकाश नामेवार 
चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेस पक्षांतर्गत निर्माण झालेल्या वादावर अखेर तोडगा निघाला आहे. पक्षश्रेष्ठींच्या तातडीच्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात आला असून, पक्षहितासाठी आपण दोन पावले मागे घेतल्याचे स्पष्टीकरण काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिले.

चंद्रपूर महापालिकेतील नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापण्याच्या हालचालीमुळे काँग्रेसमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीत चंद्रपूरमधील राजकीय स्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, **काँग्रेस गटनेत्याची निवड प्रदेशाध्यक्ष करतील**, तर **महापौर खासदार प्रतिभा धानोरकर आणि स्थायी समितीबाबतचा अंतिम निर्णय विजय वडेट्टीवार घेतील**, असे ठरवण्यात आले आहे. तसेच चंद्रपूर महापालिकेतील महापौर पदाची जबाबदारी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडे राहील. जे नगरसेवक काँग्रेसला समर्थन देतील, त्यांना उपमहापौर पद देण्याबाबतही सहमती झाली आहे.

नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, गेली पंचवीस वर्षे आपण काँग्रेस पक्षासाठी काम करत असून पक्षाच्या हितासाठी संयम बाळगावा लागतो. नेता म्हणून टीका, आरोप सहन करूनही पक्षासाठी योग्य तो निर्णय घ्यावा लागतो. याच भूमिकेतून यावेळीही आपण दोन पावले मागे घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, चंद्रपूरमध्ये सत्तास्थापनेसाठी भाजपकडून हालचाली सुरू असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. नगरसेवकांना आमिष दाखवले जात असून एक कोटी रुपये तसेच पदांचे प्रलोभन देण्यात येत असल्याचा गंभीर दावा त्यांनी केला. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना सत्तेसाठी अपक्षांच्या पाठिंब्याची गरज आहे. अशा परिस्थितीत पैसा आणि पदांच्या जोरावर अपक्ष फुटतील का, हा खरा प्रश्न असल्याचे वडेट्टीवार यांनी नमूद केले.