जनविकास सेना व एआयएमआयएमची ‘महानगर आघाडी’ स्थापन

 जनविकास सेना व एआयएमआयएमची ‘महानगर आघाडी’ स्थापन

पप्पू देशमुख यांची गटनेतेपदी निवड





चंद्रपूर | आकाश नामेवार |23 जानेवारी

चंद्रपूर शहर महानगरपालिकेत राजकीय घडामोडींना वेग आला असून जनविकास सेना आणि एआयएमआयएम या पक्षांनी एकत्र येत ‘महानगर आघाडी, चंद्रपूर’ या नव्या गटाची अधिकृत नोंदणी केली आहे. नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आज या गटाची नोंद करण्यात आली.

या आघाडीत जनविकास सेनेचे वडगाव प्रभागातून निवडून आलेले नगरसेवक पप्पू देशमुख, मनिषा बोबडे आणि प्रतिक्षा येरगुडे यांचा समावेश आहे. तसेच एकोरी प्रभागातून एआयएमआयएमचे नगरसेवक अझहरुद्दीन शेख हे देखील या नव्या गटात सहभागी झाले आहेत. चार नगरसेवकांचे संख्याबळ असलेल्या या आघाडीच्या गटनेतेपदी पप्पू देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महत्वाची बाब म्हणजे जनविकास सेनेने यापूर्वी काँग्रेस पक्षासोबत निवडणूकपूर्व आघाडी करून तीन जागांवर यश संपादन केले होते, तर एआयएमआयएमने एक जागा जिंकली होती. नव्या गटाच्या स्थापनेमुळे महापालिकेतील सत्तास्थापनेच्या गणितात ‘महानगर आघाडी’ निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यावेळी बोलताना गटनेते पप्पू देशमुख यांनी स्पष्ट केले की, “चंद्रपूर शहरात स्वच्छ, पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. जर काँग्रेस पक्षाने तशी ठोस हमी दिली, तर सत्ता स्थापनेसाठी त्यांना पाठिंबा देण्यास आम्ही तयार आहोत.”

या नव्या राजकीय घडामोडीमुळे चंद्रपूर महानगरपालिकेतील आगामी सत्तासमीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.