प्रजासत्ताक दिनी चार वर्षांच्या अधीरचा तिरंग्यासह स्केटिंग पराक्रम; 7 मिनिटांत केला ऐतिहासिक प्रवास
चंद्रपूर | आकाश नामेवार
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने चंद्रपूर शहरात देशभक्तीचा अनोखा आविष्कार पाहायला मिळाला. अवघ्या चार वर्षांचा अधीर अमृता सुबोध जुन्नावार याने इनलाईन स्केटिंग करत हातात तिरंगा फडकावत गांधी चौक ते जटपुरा गेट हे अंतर केवळ 7 मिनिटांत पूर्ण केले. या धाडसी उपक्रमामुळे उपस्थित नागरिकांमध्ये देशप्रेमाची भावना अधिक दृढ झाली.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी जमलेल्या नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात अधीरचे स्वागत केले. “वंदे मातरम्” आणि “भारत माता की जय”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. इतक्या लहान वयात दाखवलेला आत्मविश्वास, शिस्त आणि शारीरिक तंदुरुस्ती पाहून अनेकांनी अधीरचे कौतुक केले.
अधीर जुन्नावार हा चंद्रपूर येथील माउंट कार्मेल कॉन्वेंट स्कूलमध्ये नर्सरी वर्गात शिक्षण घेत आहे. केवळ चार वर्षांच्या वयात त्याने क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय यश मिळवले आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘अचिव्हर्स ऑलिम्पियाड’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळवणारा तो या वयोगटातील पहिला विद्यार्थी ठरला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल माउंट कार्मेल कॉन्वेंट शाळेत विशेष गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. थॉमस चर्च तुकूमचे फादर बिपीन यांच्या हस्ते अधीरला पदक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका सिस्टर कॅथरीन, वर्गशिक्षिका मीनाक्षी, शिक्षकवर्ग, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याशिवाय, दैनिक भास्करच्या वतीने नागपूर येथे आयोजित इनलाईन स्केटिंग स्पर्धेतही अधीरने सहभाग घेत उत्कृष्ट कामगिरी करत पदक मिळवले आहे. सततचा सराव, जिद्द आणि योग्य मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाल्याचे त्याच्या पालकांनी सांगितले.
अधीरच्या या यशामुळे जुन्नावार कुटुंबासह संपूर्ण चंद्रपूर शहराचा अभिमान वाढला असून, भविष्यात तो राज्य व देशपातळीवर आणखी मोठी कामगिरी करेल, असा विश्वास पालक, शिक्षक आणि प्रशिक्षकांनी व्यक्त केला आहे.