आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्तक्षेपामुळे भाजी विक्रेत्या महिलांना मोठा दिलासा

महापौर–उपमहापौरांची तातडीची पाहणी; टिळक मैदानात सुसज्ज प्रसाधनगृह उभारण्याचा निर्णय

चंद्रपूर : गोलबाजार परिसरातील भाजी विक्रेत्या महिलांना भेडसावणाऱ्या प्रसाधनगृहाच्या गंभीर समस्येवर आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे अखेर तोडगा निघण्याच्या दिशेने ठोस पाऊल उचलण्यात आले आहे. महिलांच्या अडचणींची दखल घेत आ. मुनगंटीवार यांनी महानगरपालिकेला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिल्यानंतर महापौर व उपमहापौरांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.

गोलबाजारसमोरील टिळक मैदान परिसरात मोठ्या संख्येने भाजी विक्रेत्या महिला दररोज व्यवसाय करतात. मात्र, शौचालयासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने महिलांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत होते. या संदर्भात संबंधित महिलांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आपली व्यथा मांडली होती.

या मागणीची गंभीर दखल घेत आ. मुनगंटीवार यांनी संगीता खांडेकर (महापौर) आणि प्रशांत दानव (उपमहापौर) यांना तातडीने आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार गुरुवार, दि. १३ फेब्रुवारी रोजी महापौर व उपमहापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांसह टिळक मैदान परिसराची पाहणी केली.

पाहणीदरम्यान महिलांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. यावेळी महापौरांनी टिळक मैदान परिसरात सुसज्ज, स्वच्छ व महिलांसाठी सुरक्षित प्रसाधनगृह उभारण्याचे स्पष्ट निर्देश महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच हे काम तात्काळ पूर्ण करून महिलांना दिलासा देण्यावर भर देण्यात आला.

या पाहणीवेळी महिला महामोर्चा अध्यक्ष छबुताई वैरागडे, नम्रताताई ठेमस्कर, डॉ. मंगेश गुलवाडे, बंडू गौरकार, सुनीता जयस्वाल, सविता सरकार, कल्पना बागुलकर, सुषमा नागोसे, धनराज कोवे, आशा आबोजवार यांच्यासह स्वच्छता अधिकारी व महानगरपालिका अभियंता उपस्थित होते.

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे आणि महापौर-उपमहापौरांच्या तात्काळ निर्णयामुळे भाजी विक्रेत्या महिलांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. महिलांनी आमदार मुनगंटीवार यांच्यासह महापौर संगीता खांडेकर व उपमहापौर प्रशांत दानव यांचे मनःपूर्वक आभार मानत लवकरच समस्या कायमस्वरूपी सुटेल, असा विश्वास व्यक्त केला आहे